पाणी


मानवी जीवनात पाण्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. उन्हाळ्यात निर्माण होणारी भीषण पाणीटंचाई, पिण्याच्या पाण्यासाठी मागवावे लागणारे टँकर्स, पाण्याअभावी करपलेली शेती यांची दाहकता शब्दांपलीकडली आहे. हा जीवन जाळणारा वणवा बघून कळतं की पाण्याला “जीवन” असं का म्हणतात.

 

भारताच्या अनुषंगाने विचार केला तर आपली पिण्यासाठी, घरगुती वापरासाठी आणि शेतीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याची गरज भागते ती मुख्यत्वे भूजलाद्वारे. वेगवेगळ्या संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, भूजलावर अवलंबित्व असलेला भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश आहे. देशातील पिण्याच्या पाण्याचा ८०-९०% ग्रामीण पाणीपुरवठा आणि ४०-५०% शहरी पाणीपुरवठा पूर्णतः भूजलावर अवलंबून आहे. शिवाय, भूजलावर अवलंबून असलेल्या सिंचनाचे प्रमाणही ६५-७०% एवढे अवाढव्य आहे. एखाद्या खेडेगावातील फक्त पिण्याच्या पाण्याची वार्षिक गरज लक्षात घेतली तर ही गरज एकूण उपलब्ध पाण्याच्या केवळ ०.२% एवढी अत्यल्प आहे. असं असूनही मनुष्याची ही मूलभूत गरज पूर्ण करणारं जमिनीच्या खाली दडलेलं भूजल हा विषय सगळ्यात दुर्लक्षित आहे.

 

पाणी कृत्रिमरित्या निर्माण करता येत नाही हे समाजातील प्रत्येक स्तरापर्यंत जाऊन पोहोचलं तरच ग्रामीण व शहरी भागात होणाऱ्या पाण्याच्या अनियंत्रित वापरावर निर्बंध येतील. पण ‘आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार’ हे लक्षात न घेता होणारा बेसुमार भूजल उपसा नियंत्रित करण्यासाठी भूजल व्यवस्थापनाचे मर्म सर्वसामान्य उपभोक्त्यांपर्यंत पोहोचविणं अपरिहार्य आहे.

महाराष्ट्रातील सुमारे ४४००० गावं, त्यांचं भूजलावरचं अवलंबित्व आणि तेथील पाण्याच्या विविध समस्यांचा अवाका लक्षात घेतला तर हे कोणा एकट्या-दुकट्या संस्थेचं किंवा फक्त सरकारचं काम नाही. ‘पाणी’ हा विषय जरी कितीही चावून चोथा झालेला असला तरी याबद्दल बऱ्याच गैरसमजुती किंवा अज्ञान दिसून येतं. यासाठी सर्वांनी जलसाक्षर होऊन व्यक्तिगत आणि स्थानिक पातळीवर ‘भूजला’चं नियोजन शास्त्रोक्त पद्धतीने सुरु करायला हवं.