साधना आमटे


Sadhanatai Amte

बाबा आमटेंच्या सहधर्मचारिणी एवढीच साधनाताईंची (पूर्वाश्रमीच्या इंदू घुले) ओळख नव्हती. सेवेच्या कामात आत्मीयता आणून संस्थांना कुटूंबाचा चेहराच नव्हे तर प्रकृती प्राप्त करून देणाऱ्या संस्काराच्या त्या प्रेरणारुप प्रतिनिधी होत्या. बाबांनी कामे उभारायची आणि साधनाताईंनी त्यांच्या विधायक प्रवृत्तीत एक प्रसन्न आपलेपण आणायचे अशी त्यांच्यातली श्रमविभागणी होती…

 

५ मे १९२६ रोजी नागपूर येथे महामहोपाध्याय घुले शास्त्र्यांच्या वेदशास्त्रसंपन्न, कर्मठ घरात इंदूचा जन्म झाला. वडिलांच्या अकाली निधनानंतर आईच्या बरोबरीने घराची जबाबदारी तिने धीटपणे उचलली. जाचक सामाजिक रुढी-परंपरांच्या चौकटीत राहूनही हरिजन वस्तीतील बायकांना नळाला हात लावायची परवानगी नाही म्हणून घराच्या विहिरीतील पाणी काढून देणाऱ्या या मुलीने बाबा आमटे नावाच्या संन्याश्याशी साऱ्यांचा विरोध पत्करून लग्न केले आणि हरिजन स्त्रियांना हळदीकुंकू लावून तीच चौकट अगदी सहजपणे मोडून टाकली. बाबांनी उभारलेल्या अठरापगड जातीधर्मांच्या माणसांच्या सामुहिक कुटूंबात आपले सर्वस्व विसरून सहभागी झालेल्या इंदूची ‘साधनाताई’ झाली.

 

कुष्ठरोग्यांना सोबत घेऊन बाबांनी माळरानावर संसार मांडला तेव्हाही साधनाताई त्यांच्याचएवढी जिद्द घेऊन कामात सहभागी झाल्या. स्वत्व राखायचे आणि उरलेल्या आपलेपणाला मीपणाचा तोरा कधी चिकटू द्यायचा नाही ही किमया साधलेल्या साधनाताईंचे त्या साऱ्या उभारणीतले अस्तित्व जाणवणारे आणि तरीही डोळयावर न येणारे होते.

 

बाबांवाचून त्यांना वेगळे आयुष्यही नव्हते. “I sought my God, my God I could not see, I sought my friend, my friend eluded me, I sought my husband & I got all the three’ असे त्या म्हणायच्या. तरीही बाबांच्या पश्चात त्या हिंमतीने उभ्या राहिल्या. आनंदवनाच्या दैनंदिन व्यवहारावरची त्यांची नजर आणि पकड कायम राहिली. त्यांच्या मूळ स्वभावातील जिव्हाळयाला जास्तीचे भरते आलेलेच या काळात सभोवतीच्या साऱ्यांच्या लक्षात आले. बाबांचा अभाव कोणालाही जाणवू नये या त्यांच्या इच्छेची ती परिणती असावी. २०११ मध्ये त्यांना कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने गाठले. मात्र त्यांच्या चर्येवरचे प्रसन्न हास्य आणि डोळयातला आशीर्वादाचा भाव त्या विकाराला कधी पराभूत करता आला नाही. आपले असामान्यत्व कोणालाही बोचू नये एवढे सामान्यत्व जपणाऱ्या साधनाताई अखेरच्या श्वासापर्यंत स्थिरचित्त आणि हसतमुख राहिल्या.