सामाजिक संस्थांचे सशक्तीकरण


विविध सामाजिक प्रश्नांवर काम करणाऱ्या संस्था महाराष्ट्रभर विखुरल्या आहेत. मात्र, शेती, पाणी, रोजगार, आरोग्य आणि शिक्षण या मुलभूत क्षेत्रांत निर्माण होणाऱ्या प्रश्नांचा आवाका आणि आव्हानांची दाहकता एवढी जास्त आहे की वर्षानुवर्षं यशस्वीरित्या कार्यरत असणाऱ्या संस्थाही वैफल्यग्रस्त होतात. मग समाजातील प्रश्नांकडे डोळसपणे बघण्याची आणि त्यावर तोडगा काढण्याची असामान्य इच्छाशक्ती असणाऱ्या एकट्यादुकट्या संस्थेचा ध्येयवाद व्यवहाराच्या आणि नवअर्थकारणाच्या वावटळीत टिकून राहणे अवघड आहे. यासाठी समाजाचा सक्रिय सहभाग आणि समविचारी कार्यकर्त्यांचा सहयोग अशा प्रयत्नांना मिळणं गरजेचं आहे.

 

गेल्या ६७ वर्षांतील आनंदवनाच्या कामाचा अनुभव लक्षात घेता, कोणत्याही सामाजिक संस्थेला सुरुवातीच्या काळात अनेक कसोट्यांना सामोरं जावं लागतं. ही आव्हानं पेलताना जो विचार किंवा कार्यक्षेत्र डोक्यात ठेवून संस्था सुरु केली जाते, त्यापासून विचलित होण्याचा संभव असतो. अशा सामाजिक संस्थांच्या सशक्तीकरणासाठी आनंदवन ‘दुवा’ म्हणून काही पाऊलं उचलत आहे, जेणेकरून या संस्थांचं कार्य जास्तीत जास्त गरजू घटकांपर्यंत गुणात्मकरित्या विस्तारू शकेल. “चांगलं काम, चांगली माणसं आणि चांगले प्रयत्न” यांची एकमेकांशी सांगड घालण्यासाठी हा एक प्रयास आहे.