रोजगार निर्मिती


पाण्याची टंचाई, नापिकी आणि रोजगाराचा अभाव यामुळे गांजलेले लोक दरवर्षी राज्याच्या ग्रामीण भागातून शहरांकडे स्थलांतर करतात आणि कसेतरी तग धरून राहतात. त्यामुळे शेतीच्या विकासाबरोबरच ग्रामीण भागातील तरुणांना उद्यमशील बनवण्यासाठी प्रयत्न करणं, त्यांना रोजगाराच्या वेगवेगळ्या दिशा दाखवणंही आवश्यक आहे. गावखेड्यांत स्वयंपूर्ण, शाश्‍वत आणि काळाशी सुसंगत असे नवे रोजगार तयार झाले तर दरवर्षी राज्याच्या ग्रामीण भागातून होणारी स्थलांतरं रोखता येतील.

 

आनंदवन हे कुष्ठकार्याबरोबरच शाश्वत उद्यमशीलतेचं प्रतिक आहे. लोकांना स्वतःच्या पायावर उभं करणं, त्यांचा आत्मसन्मान जागरूक करणं हा त्यांच्या यशस्वी आणि सुखी आयुष्याचा मूलमंत्र आहे. याच विचारातून, आनंदवन समाजभान अभियानांतर्गत ज्या मागास व दुष्काळी भागांत काम सुरु आहे, तेथील मंडळींना रोजगाराभिमुख उद्योगधंद्याचं प्रशिक्षण देण्याबद्दल पावलं उचलली जात आहेत.

बॅग शिलाई, हँडलूम, मेटल फॅब्रिकेशन, डेअरी, हँडमेड ग्रीटिंग कार्डस् आणि इलेक्ट्रिक फिटिंग व प्लंबिंग इत्यादी कौशल्यांचं निवासी प्रशिक्षण इच्छुकांना आनंदवनात देण्यात येतं. प्रशिक्षण घेऊन परतलेल्या या मंडळींनी आपापल्या गावांमध्ये स्वयंरोजगार सुरू करावा, आपल्याबरोबर गावातल्या इतरांनाही विकासाच्या प्रक्रियेत सामील करून घ्यावं आणि गावांमध्ये या उद्योगांसाठीची क्लस्टर्स तयार व्हावीत, अशी आमची इच्छा आहे.