समाजभानची ओळख


नवनवी आव्हानं शोधण्याचा आणि स्वीकारण्याचा यत्न ‘आनंदवना’ने कायमच केला आहे. आज शेती, पाणी, रोजगार, आरोग्य आणि शिक्षण या मुलभूत क्षेत्रांत महाराष्ट्र विविध आव्हानांना सामोरा जातो आहे. जेव्हा मुद्दा आर्थिकदृष्ट्या मागास, दुष्काळग्रस्त प्रदेशांचा असतो तेव्हा या आव्हानांची दाहकता अनेक पटीने वाढते. या पार्श्वभूमीवर आनंदवनाने १ जानेवरी २०१६ पासून एक नवा उपक्रम हाती घेतला आहे. त्याचं नाव – ‘आनंदवन समाजभान अभियान’. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात अकोला जिल्ह्यातील काही गावं, यवतमाळमधील झरी-जामनी तालुका, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका आणि सातारा-सांगली-सोलापूर या जिल्ह्यांतल्या मागास व दुष्काळी भागांमध्ये शेती, जलसंधारण आणि रोजगार निर्मिती या मुद्द्यांवर ‘आनंदवन समाजभान अभियाना’चं काम सुरु झालं.

 

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातल्या करंजी या गावी गाळाने बुजलेल्या तलवार नदीच्या खोलीकरणाचं आणि रुंदीकरणाचं काम करण्यात आलं. डोह पद्धतीने नदीचं पुनरुज्जीवन केल्यामुळे करंजी आणि त्या परिसरातील पाच गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली. आष्टी तालुक्यातील ४४ तरुण स्त्री-पुरुषांना तसंच अकोला जिल्ह्यातल्या बार्शी-टाकळी तालुक्यातील ६ तरुणांना रोजगाराभिमुख उद्योगधंद्यांचं निवासी प्रशिक्षण आनंदवनात देण्यात आलं. यवतमाळ जिल्ह्यातील झरी-जामनी तालुक्यातल्या मांडवा या गावात डोंगरउतारावर असलेल्या शेतीतील माती आणि पेरलेलं बियाणं पाण्याच्या लोंढ्यामुळे वाहून जाण्याचा प्रश्न दर पावसाळ्यात भेडसावत होता. तिथे दोन किलोमीटर लांबीचा आडवा चर खणून त्याद्वारे पावसाचं पाणी शेतांच्या बाजूने वळवत बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे खरीप हंगामात दुबार-तिबार पेरणी करावी लागण्याचं दुष्टचक्र थांबलं. अशा वेगवेगळ्या माध्यमांमधून ‘आनंदवन समाजभान अभियान’च काम आकार घेत आहे. लोकांची नेमकी गरज ओळखून त्यावर      ‘लोकेशन स्पेसिफिक आणि नीड बेस्ड’ पद्धतीने काम करणं हा या अभियानचा हेतू आहे.

 

पुढील कामांची दिशा ठरवितांना असं लक्षात आलं की this is just the beginning; अशी अनेक क्षेत्रं आहेत जिथे पोहोचायचीही गरज आहे. मग ते भूजल व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन, अन्न सुरक्षा असे अगदी रोजच्या व्यवहारातले विषय असोत किंवा पारंपारिक कलाकुसरींची जोपासना आणि संवर्धन, सरकारी धोरणांत सुधारणा, माहितीचा अधिकार, आर्थिक साक्षरता, वाचन संस्कृती असे थोडे वेगळे विषय असोत. आम्ही नेहमीच म्हणतो की ‘आनंदवन समाजभान अभियान’ हे लोकांनी लोकांसाठी चालविलेलं अभियान आहे. हा एक असा Outreach Program आहे ज्याच्या कक्षा  लोकसहभागातून आणि लोकशक्तीतूनच रुंदावत जातील.