बाबा आमटे


Baba Amte

मुरलीधर देविदास आमटे म्हणजेच बाबा आमटे हे एक वादळी व्यक्तिमत्व होते. बाबांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ चा. सरंजामी घराण्यात जन्म घेतलेला, एक पैलवानी बेफिकीरपण वृत्तीत असलेला, जत्रेतील कुस्ती जिंकून मिळालेले पदक स्वत:च्या सदऱ्यावर नव्हे तर चक्क छाताडावर टोचून घेणारा, राजगुरुंसारख्या क्रांतीकारकांना मदत करणारा, रेल्वेत भारतीय अबलेची छेड काढणा-या सशस्त्र ब्रिटीश सोजिरांशी धीटपणे मुकाबला करून महात्मा गांधींकडून ‘अभयसाधक’ ही उपाधी प्राप्त करणारा, तत्वांसाठी वडिलोपार्जित वैभवावर पाणी सोडणारा, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोड्याचे उपनगराध्यक्षपद भूषवित असतांना सफाई कामगारांच्या समस्या समजावून घेण्यासाठी स्वत:च्या डोक्यावरून वर्षभर मैला वाहण्याचे काम करणारा, अठरापगड जाती-धर्माच्या कुटुंबांना सोबत घेत ‘श्रमाश्रमा’चा अभिनव सामुहिक प्रयोग करणारा आणि एवढे सगळे करत असतांनाही जगावेगळे काही करत असल्याची जाणीव पुसून टाकणारा हा एक एक अष्टपैलू तरुण…

 

एकदा मैला वाहून नेण्याचे काम संपवून घरी परतत असतांना बाबांना रस्त्याच्या कडेला खितपत पडलेला तुळशीराम नावाचा कुष्ठरोगी दिसला आणि त्याचे भेसूर रूप बघून हा ‘अभयसाधक’ भयग्रस्त झाला. घाबरून पळतच बाबा घरी परतले पण आपली प्रिय पत्नी सौ. साधना हिला पाहून विचार करू लागले की, ‘उद्या हिलाही कुष्ठरोग झाला तर मला हिचीही भिती वाटेल? जिथे भिती आहे, तिथे प्रीती कसली?’ आणि प्रीतीने भितीवर विजय मिळवला. अशा एका अत्यंत आगळ्यावेगळया, मानवतावादी प्रेरणेतून ‘आनंदवना’चा जन्म झाला! रुग्णांना त्यांच्या हतबलतेची जाणीव करून देणारे ‘करुणालय’ किंवा ‘कुष्ठनिवास’ अशासारखे नाव न देता ‘जिथला आनंद तिथल्या रोगापेक्षाही अधिक संसर्गजन्य आहे’ असे ‘आनंदवन’ हे नाव या प्रकल्पाला बाबांनी दिले.

 

आनंदवनाच्या प्रत्येक शब्दात, योजनेत आणि कृतीत ही काव्यमयता बाबांनी जपलीच, पण शास्त्रशुद्ध प्रशिक्षण, अत्यंत चोख व्यवस्थापन आणि लोकाभिमुख प्रशासन यांची कृतीशील जोडही त्यांनी आपल्या काव्यमयतेला दिली. कुष्ठरुग्णांनी गमावलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यासाठी उत्तम शेती आणि अनेक कुटीरोद्योग बाबांनी कुष्ठरुग्णांच्या झडलेल्या बोटांतून घडवले. आनंदवनाचे एकमेवाव्दितीयत्व म्हणजे बाबा आणि साधनाताईंनी कुष्ठरुग्णांना केवळ आत्मसन्मानाचा ताठ कणाच दिला नाही, तर त्यांच्या मनात इतर अंध, कर्णबधीर, विकलांग, अल्पभूधारक शेतकरी, अन्यायग्रस्त आदिवासी इ. दु:खितांविषयी, गरजू घटकांविषयी सहवेदनाही जागवली. एका प्रकारच्या पिडीतांनी स्वत:चे पुनर्वसन घडवून आणल्यावर तेवढ्यावरच न थांबता अन्य दुर्लक्षित समाजघटकांना निरपेक्ष मदतीचा हात दिल्याचे आनंदवन हे जगातील एकमेव उदाहरण आहे.

 

आता बाबा नाहीत आणि साधनाताईही नाहीत. मात्र त्यांच्यामागे त्यांच्याविषयीचा श्रद्धाभाव बाळगणारे जगभरचे चाहते आहेत. कुष्ठरोग संपविण्याच्या राष्ट्रीय प्रेरणा आहेत. अपंगाना समर्थ बनविण्याची आव्हाने आहेत. दु:ख आणि दैन्य यांच्याशी लढे देण्याच्या प्रतिज्ञा आहेत. बाबा आणि साधनाताईंचा आनंदवनावरचा संस्कार मोठा आहे.  त्यामुळे आनंदवनाचं रोपटं रुजवणा-या साधनाताई-बाबांनंतरही आनंदवनाचं काम थांबलं किंवा मंदावलं नाही. आनंदवनाच्या पुढच्या पिढ्या कामाची जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेत समर्थपणे वाटचाल करत आहेत.