आनंदवनाविषयी


भीतीवर प्रीतीचा विजय व्हावा’ या प्रेरणेतून बाबा आमटे यांनी महारोगी सेवा समिती, वरोरा या सामाजिक संस्थेची स्थापना केली आणि जेथील ‘आनंद’ हा कुष्ठरोगापेक्षाही अधिक ‘सांसर्गिक’ आहे, असे ‘आनंदवन’ फुलवले. कुष्ठरूग्णांच्या पुनर्वसनाचे स्वप्न साकारण्यासाठी बाबा आणि साधनाताईंनी १९४९ साली चंद्रपुर जिल्हातील वरोरा गावाजवळच्या पडीक माळरानावर प्रवेश केला, तेव्हा त्यांच्याजवळ होती – विकास व प्रकाश ही दोन कोवळी मुले, सहा कुष्ठरुग्ण, एक लंगडी गाय आणि अवघी चौदा रुपयांची पुंजी.

पण या जोडीला त्यांच्याजवळ दुर्दम्य आशावादाची उदंड उर्जाही होती आणि या उर्जेच्या बळावरच बाबा आणि साधनाताईंनी कुष्ठरूग्णांच्या मनात आत्मसन्मानाची प्रेरणा आणि इतर पीडितांविषयीची करूणाही जागवली. त्यामुळेच स्वतःच्या वेदनांवर विजय मिळवून या कुष्ठरुग्णांनी अंध, अपंग, कर्णबधीर, अनाथ, भूकंपग्रस्त, बेरोजगार ग्रामीण युवा, अन्यायग्रस्त आदिवासी, अल्पभूधारक शेतकरी अशा इतर वंचीत घटकांना सोबत घेऊन समर्थ वाटचाल केली. ६३१ एकरांवर वसलेलं आनंदवन हे आज स्वतःची वेगळी ग्रामपंचायत असलेले अडीच हजार लोकसंख्येचे एक आदर्श ग्राम बनले आहे ज्याचा डोलारा स्वावलंबनाच्या पायंड्यावर आधारलेला आहे. ‘श्रम ही है श्रीराम हमारा’ या मंत्रानुसार आज आनंदवनात शेती, शेतीपूरक उद्योग यांबरोबर सुतारकाम, मेटल फॅब्रिकेशन, इलेक्ट्रिकल फिटिंग, प्लंबिंग, वाहन दुरुस्ती, हातमाग, यंत्रमाग, छापखाना, हस्तकला, चर्मकला इत्यादी सुमारे ४० प्रकारच्या उद्योगांतून हजारो वस्तू व सेवांची निर्मिती होत असते. आनंदवनाखेरीज सोमनाथ, अशोकवन, हेमलकसा, मूळगव्हाण अशा अनेक प्रकल्पांव्दारे महारोगी सेवा समितीने रचनात्मक कार्याचे उत्तुंग मापदंड प्रस्थापित केले आहेत. दरवर्षी १ लाखांपेक्षा अधिक गरजू बांधवांना मुख्यतः आरोग्य, त्याचबरोबर शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, जल-मृद संधारण, सुधारित शेती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मदत दिल्या जाते. गेल्या ६७ वर्षांमध्ये तब्बल २७ लक्ष गरजूपर्यंत महारोगी सेवा समितीच्या कार्याचा लाभ पोचला आहे.